भुसावळात थकबाकीदारांच्या दारी ढोल-ताशे वाजवून कर वसुली
पालिकेच्या अनोख्या मोहिमेची चर्चा : 31 मार्चपूर्वी कर भरण्याचे आवाहन
भुसावळ : नाशिक विभागात एकमेव अ वर्ग पालिकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने मार्च एण्ड पूर्वी पालिकेने थकबाकी वसुलीवर भर दिला आहे शिवाय थकबाकी वसुलीसाठी पालिकेने गुरुवार, 25 पासून थकबाकीदारांच्या दाराबाहेर ढोल-ताशे वाजवून वसुली करीत असल्याने या अनोख्या वसुलीची चर्चा शहरात रंगली आहे. थकबाकीदारांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची थकबाकी, भरावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षांपासून 39 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
थकबाकीदारांचे नाव मुख्य चौकात झळकणार
10 फेब्रुवारी 2021 पासून थकबाकीदारांची नावे फेसबुक, व्हॉटसअॅप, सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल करून शहराच्या मुख्य चौकात मोठे बॅनर्स लावून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 20 फेब्रुवारी 2021 पासून थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल-ताशे वाजवून त्यांना जागे करण्याचे काम करत त्यांचे मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. नळ कनेक्शन खंडीत करून व वाजंत्री लावूनही 15 दिवसाचे आत त्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा न केल्यास त्यांची मालमत्तेची वा मालमत्तेचा सामानाची कायदेशीर जप्ती करून अधिपत्र फी व दंड आकारून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.