नाहाटा महाविद्यालयाजवळ वाहनांवर दरोडा पडण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या ; आरोपींना कोठडी
भुसावळ- तलवारीच्या धाकावर वाहनांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून असलेल्या कुविख्यात कलीम शेख सलीमच्या टोळीतील तिघांच्या बाजारपेठ पोलिसांच्या गस्ती पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत तर अन्य दोन संशयीत पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरोडा टाकण्यापूर्वीच शुक्रवारी रात्री 12.30 वाजेनंतर बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईने समाधान व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांनी आवळल्या मुसक्या
जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालयाजवळ दरोड्याच्या उद्देशाने काही संशयीत तलवारी घेवून उभे असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख, एएसआय अंबादास पाथरवट, हवालदार सुनील जोशी, सुनील थोरात, दीपक जाधव, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, संदीप परदेशी, योगेश माळी, विनोद वीतकर, निलेश बाविस्कर, मंदार महाजन, गुलबक्ष तडवी, वाहन चालक एएसआय तस्लीम पठाण आदींच्या पथकाने धाव सुरेश राजू पवार उर्फ टकल्या (25, दीनदयाल नगर, भुसावळ), शुभम धनराज साबळे (19, दीनदयाल नगर) व संदीप बुधा खंडारे (इंदिरा नगर, भुसावळ) यांना दोन तलवारीसह अटक केली तर टोळीचा म्होरक्या कलीम शेख सलीम (दीनदयाल नगर, भुसावळ) व गोल्या शेख शरीफ (दीनदयाल नगर, भुसावळ) हे पसार झाले आहेत. आरोपींविरुद्ध योगेश नामदेव माळी यांच्या फिर्यादीनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक निशीकांत जोशी करीत आहेत. दरम्यान, आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वेश्या व्यवसाय ऐरणीवर
शहरातील वैतागवाडी भागात बंगालसह राजस्थानातील तरुणींकडून वेश्या व्यवसाय सुरू असून कुविख्यात गुन्हेगार त्यांच्याकडून खंडणी वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या भागातील वेश्या व्यवसायाचा बीमोड केल्यास निश्चितच गुन्हेगारी कमी होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.