शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी ; पोलिसांची गस्त नावालाच
भुसावळ : शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन पावलांवर असलेल्या व गजलेल्या तार ऑफिस रस्त्यावर चोरट्यांनी तब्बल एकाच रांगेतील आठ तर नगरपालिका दवाखान्यासमोर तब्बल दोन दुकाने फोडल्याने व्यावसायीकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांचा धाक संपल्याने गुन्हेगारी वाढल्याचा सूर नागरीकांमधून व्यक्त होत असून पोलिसांची गस्तदेखील आता नावालाच ठरत असल्याची टिका होत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरू असताना डिटेक्शन मात्र शून्य असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
एकाचवेळी दहा दुकाने फोडली
शहरात आतापर्यंत चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असताना रविवारी पहाटे मात्र एकाचवेळी तब्बल दहा दुकाने फुटल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली. शहरात बहुधा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर चोर्या झाल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी तार ऑफिस रस्त्यावरील दिलीप राजपूत यांच्या मालकिच्या हॉटेल राजपूतमधून 700 रुपयांची रोकड लांबवली अहमद इंजिनिअरींग वर्क्समधून सात हजार रुपये किंमतीचे दोन जॅक लांबवले तसेच विकास संजय पगारे यांच्या विकास मेन्स पार्लरमधून एक हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. ब्रोकर्स संदीप राणे यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले मात्र काहीही ऐवज चोरीस गेला नाही तर बापू चौधरी यांच्या बी.एस.टेलर्स या दुकानाचे कुलूप तुटले मात्र पट्टी अडकल्याने चोरी टळली तर
संदीप राजेंद्र अहिरे यांच्या रुपाली मेन्स पार्लरचे कुलूप तोडण्यात आले मात्र काहीही रक्कम गेली नाही तर असलम बेग यांच्या युटीक रेडीयमचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला शिवाय पं.रवीओम शर्मा यांच्या दुकानाचे शटर उघडण्यात आले मात्र दुकानात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नगरपालिकेसमोरील आर.के.मिठाई व शेजारी असलेल्या यादव पान सेंटरकडे वळवला. पान सेंटरमधून शंभर रुपयांची चिल्लर गेली तर मिठाई सेंटरमधून काय चोरीस गेले? हे कळू शकले नाही.
पोलिस म्हणतात चोरी झालीच नाही
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, दुकानांचे कुलूप तोडण्यात आले असलेतरी कुठल्याही दुकानातून काही चोरीला गेलेले नाही शिवाय दुकानदार तक्रार देण्यास पुढे आले नसल्याने या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एका मेडिकल दुकानात सीसीटीव्ही असलेतरी त्यात बाहेरचे दृश्य दिसत नसल्याने चोरट्यांबाबत माहिती मिळू शकली नसल्याचे ते म्हणाले.
गुन्हेगारी वाढली ; डिटेक्शन शून्य
शहरात गुन्हेगारीने कहर केला आहे. चोर्या-घरफोड्यांसोबत अन्य गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असताना डिटेक्शन मात्र शून्य आहे. गोपनीय विभाग, डीबी शाखा असल्यातरी गेल्या अनेक दिवसात धडक कारवाई मात्र नाहीच. पोलिसांची गस्त होत असलीतरी अनेक भागात गस्तीचे वाहन फिरकत नसल्याची नागरीकांची ओरड आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी करून पोलिसांच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे.