भुसावळात दारु अड्ड्यांवर धडक कारवाई

0

भुसावळ । शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या दारुच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी डिवायएसपी निलोत्पल यांनी पथक नियुक्त करुन शनिवार 31 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेच्या दरम्यान तीन वेगवेगळ्या दारु अड्ड्यांवर धाड टाकून धडक कारवाई केली. तीन आरोपींसह यात पोलीसांनी 16 हजार 690 रुपये किंमतीच्या दारुसह इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

113 वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या केल्या जप्त
या कारवाईमुळे मात्र शहरातील अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे. शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या दारु अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी डिवायएसपी निलोत्पल यांनी पथक तयार करुन वाल्मिक नगर भागात भिमराव जानू इंगळे याच्याकडून 900 रुपये किंमतीची 35 लिटर मापाच्या कॅनमध्ये भरलेली 30 लिटर गावठी दारु, रमाबाई आंबेडकर नगर भागात कैलास सोनवणे यांच्याकडून 900 रुपयांची 35 लिटर मापाच्या कॅनमध्ये भरलेली 30 लिटर गावठी दारु, श्रावण देवरे याच्याकडून 600 रुपयांची संत्रा दारु 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुग्णालयामागील भिमवाडी भागात बानोबी मर्द मोहम्मद सलीम हि फरार झाली असून शैलेश अशोक जाधव याच्याकडून 14,290 रुपये किंमतीच्या 113 वेगवेगळ्या कंपनीच्या गावठी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप कोळी, हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, प्रदिप पाटील, संदीप चव्हाण, विशाल सपकाळे, सुनिल शिंदे यांनी कारवाई केली.