भुसावळ : उधारीत दारू न दिल्याचा राग आल्याने चौघा आरोपींनी जामनेर रोडवरील न्यू अशोका वाईन या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 12.40 वाजेच्या सुमारास आग लावली होती. या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या शोधार्थ दोन स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिली. न्यू अशोका वाईन या दारूच्या दुकानात शनिवारी हद्दपार आरोपी हेमंत पैठणकर, चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे, सागर रवींद्र चौधरी व गोलू सुलताने (रा. भुसावळ) आदींनी उधारीत दारू मागितली मात्र ती न दिल्याचा राग आल्याने चौघांनी चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानाच्या शटरला आणि आत काउंटरला आग लावली. मध्यरात्री दुकान मालक सुनील नागराणी यांना माहिती मिळताच त्यांनी दुकानाची पाहणी करीत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला होता तर नागराणी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले आहेत.