भुसावळ : उधारीत दारू न दिल्याचा राग आल्याने चौघा आरोपींनी जामनेर रोडवरील न्यू अशोका वाईन या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 12.40 वाजेच्या सुमारास आग लावली होती. या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या शोधार्थ दोन स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले होते. संशयीत आरोपी आनंद नगरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चेतन (ऊर्फ गुल्या) पोपट खडसे (25, रा.हनुमान नगर, भुसावळ), हेमंत जगदीश पैठणकर (25, रा.जामनेर रोड, भिरुड हॉस्पिटल मागे, भुसावळ) व गोलु दतात्रय सुलताने (26, रा.श्रीराम नगर भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, सागर रवींद्र चौधरी (23, रा.आनंद नगर भुसावळ) हा संशयीत पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
दारू न दिल्याने दुकान पेटवण्याचा प्रयत्न
जामनेर रोडवरील न्यू अशोका वाईन या दारूच्या दुकानात शनिवारी रात्री आरोपी हेमंत पैठणकर, चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे, सागर रवींद्र चौधरी व गोलू सुलताने (रा. भुसावळ) आदींनी उधारीत दारू मागितली मात्र ती न दिल्याचा राग आल्याने चौघांनी चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानाच्या शटरला आणि आत काउंटरला आग लावली होत तर मध्यरात्री दुकान मालक सुनील प्रल्हाद नागराणी यांना माहिती मिळताच त्यांनी दुकानाची पाहणी करीत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला होता.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोर, नाईक दीपक जाधव, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, समाधान पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. तीनही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.