भुसावळात दिशा दर्शक फलकांमुळे वाहनधारकांना दिलासा

0

नऊ ठिकाणी लावले फलक : सहा.अधीक्षकांच्या सूचनेची दखल

भुसावळ- शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्यासह वाय पॉईंट आदी भागात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तर यावल-रावेरकडून येणार्‍या वाहनांना नेमका रस्ता माहिती नसल्याने अनेकदा वाहने थेट रेल्वे लोखंडी पुलापर्यंत पोहोचण्याचे प्रकार घडले होते. याबाबत अनेकदा ओरड होवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाकडून कुठलीही घेतली जात नव्हती. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांना सूचना केली होती. गंधाले यांनी दखल घेत शहरातील विविध भागात नऊ ठिकाणी फलक लावल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या फलकांमुळे अप्रिय घटना टळण्यास आता मदत होणार आहे.

या ठिकाणी लावले फलक
शहरातील यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ चार फलक लावण्यात आले. रावेर-यावल भागाकडून येणार्‍या वाहनधारकांना दिशा कळण्यासाठी तसेच आरपीडी रोड, जळगाव रोड व शहरात येण्यासंदर्भात दिशा निर्देश फलकावर करण्यात आले आहेत शिवाय वाय पॉईंटसह नाहाटा चौफुलीवर प्रत्येकी एक फलक लावण्यात आला असून शहरातील वर्दळीच्या बसस्थानकावरही तीन फलक लावण्यात आले आहे. कुठल्या ठिकाणी पार्किंग आहे व कुठल्या ठिकाणी नो पार्किंग आहे याबाबत फलकांवर उल्लेख करण्यात आला आहे.

वाहनधारकांची गैरसोय होणार दूर- रवी निमाणी
शहरात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती शिवाय रात्री-बेरात्री अवजड वाहने शहरात शिरून अप्रिय घटना घडण्याची भीतीदेखील होती मात्र आता दिशादर्शक फलकांमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना फलकांसाठी सहकार्य करणार्‍या व विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी व्यक्त केली.