भुसावळात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 80 हजारांची रोकड लांबवली

दाम्पत्य बँकेत शिरताच चोरट्यांनी काम केले फत्ते : सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध

भुसावळ : दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली 80 हजारांची रक्कम चोरट्यांनी दाम्पत्याचे दुचाकीपासून लक्ष हटताच लांबवली. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दाम्पत्य बँकेत जाताच लांबवली बॅग
शहरातील शांताराम विठ्ठल मानकरे (तुकाराम नगर, भुसावळ) हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी असून ते व त्यांची पत्नी कुमुदिनी मानकरे या शुक्रवारी दुपारी जेडीसीसी बँकेत आल्या होत्या. प्लॉट खरेदीच्या व्यवहारासाठी रक्कम लागत असल्याने दाम्पत्याने खात्यातून 80 हजारांची रोकड काढली. दाम्पत्याने ही रोकड कागदपत्रे असलेल्या एका बॅगेत ठेवली व ही बॅग जळगाव जनता बँकेबाहेर लावलेल्या दुचाकी (एम.एच.19 सी.एच.9448) च्या डिक्कीत ठेवली. जळगाव जनता बँकेतही दाम्पत्याचे खाते असल्याने पॅनकार्ड खात्याशी लिंक करण्यासाठी दाम्पत्य जनता बँकेत शिरताच भामट्याने दुचाकीच्या डिक्कीतून कागदपत्रे व रोकड असलेली बॅग लांबवली. अवघ्या दोन मिनिटात दाम्पत्य वाहनाजवळ आले असता चोरट्याने बॅग लांबवल्याचे व दुचाकीची डिक्की उघडी दिसून आल्याने मोठा मानसिक धक्का बसला. आपल्या वाहनाजवळ काही मुले बसल्याचे मानकरे यांनी पोलिसांना सांगितले.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध
दाम्पत्याने लागलीच बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बँकेच्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून जी बॅग लांबवली त्यात बँकेचे धनादेश, पासबुक व एकूण 80 हजारांची रोकड असल्याचे मानकरे यांनी यावेळी सांगितले. पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर भर दिवसा चोरी झाल्याने व्यापार्‍यांसह ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.