भुसावळ : दुध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा पदाधिकार्यांनी 1 ऑगस्ट रोजी नाहाटा चौफुलीवर आंदोलन केले होते. जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागून असून कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स न पाळता सरकारविरुद्ध घोषणाबाजी केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्यासह पदाधिकार्यांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार, आमदार संजय सावकारे, भाजपा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, पवन बुंदेले, अमोल अरविंद महाजन, किशोर पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, अर्जुन खरारे यांच्यासह अन्य 10 ते 12 पदाधिकार्यांविरुद्ध भादंवि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल डिस्टन्स न पाळता सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.