डॉ.जयंत धांडेंसह डॉ.पंकज राणे यांच्या रुग्णालयात पथक ठाण मांडून
भुसावळ- शहरातील दोन प्रथितयश एम.डी.मेडिसीन असलेल्या डॉक्टरांकडे आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एकाचवेळी धाड टाकत तपासणी सुरू केल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती तर दुसर्या दिवशी मंगळवारीही डॉ.जयंत धांडे यांच्याकडे पथक ठाण मांडून तपासणी करीत असल्याचे सांगण्यात आले तसेच मंगळवारीदेखील जामनेर रोडवरील बालरोग तज्ज्ञ डॉ.पंकज राणे यांच्या रुग्णालयासह शासकीय ठेकेदार समीर पाटील यांच्याकडे आयकर विभागाने दिवसभर तपासणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च एण्डमुळे धडक मोहिम
मार्च एण्डमुळे कर उद्दिष्टापोटी जळगावच्या आयकर विभागाकडून धडक तपासणी मोहिम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी पांडुरंग टॉकीजमागील डॉ.जयंत धांडे यांच्या जयंत हॉस्पीटलसह जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या रुग्णालयातआयकर विभागाच्या अधिकार्यांनी अचानक धाड टाकत तपासणी केली होती. डॉ.धांडे यांच्याकडे सोमवारी राी उशिरापर्यंत तपासणी केल्यानंतर मंगळवारी पुन्हा दिवसभर तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले तर जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपीमागील बालरोग तज्ज्ञ डॉ.पंकज राणे यांच्याकडेही आयकर विभागाकडून तपासणी करण्यात आली. डॉ.राणे यांच्या दवाखान्याबाहेर भारत सरकार लिहिलेली (एम.एच.19 वाय.5515) वाहन आढळून आले तसेच शासकीय ठेकेदार समीर पाटील यांच्याकडे आयकर विभागाच्या पथकाने तपासणी केल्याचे समजते. पथकाला तपासणीत नेमके काय आढळले याचा तपशील कळू शकला नाही मात्र पथक अद्याप आणखीन काही दिवस शहरातील वैद्यकीय व्यावसायीकांसह मोठ्या व्यापार्यांच्या फर्मवर धाडी टाकणार असल्याची दाट शक्यता आहे.
डॉ.धांडे यांच्या रुग्णालयात गोपनीय पाहणी
पांडुरंग टॉकीजमागील डॉ.धांडे यांच्या रुग्णालयात आयकर विभागाच्या पथकाने धाडीपूर्वी दोन दिवस आधी रुग्णालयात येवून पाहणी करून ओपीडीचा अंदाज घेतल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.