भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या गोपनीय माहितीवरुन मुसक्या
भुसावळ : शिवीगाळ का केली? याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारासह साक्षीदारावर आरोपींनी तलवारीसह चॉपरने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, या वादाला पूर्ववैमनस्याची किनार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक
तक्रारदार शेख अजिमोद्दीन शेख रीयलोद्दीन (30, रा.ग्रीन पार्क, भुसावळ) व साक्षीदार हे सोमवारी सायंकाळी सहा वाजता अंत्ययात्रेसाठी जावून परतल्यानंतर शहरातील मुस्लिम कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ आरोपी शाकिर उर्फ गोलू व शाकीब भांजा यांनी त्यांना शिवीगाळ केली व याबाबत तक्रारदाराने जाब विचारला असता आरोपींना त्याचा राग आला व त्यांनी फिर्यादी व साक्षीदार यास लोखंडी चॉपर व तलवारीने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंगळवारी पहाटे 2.40 वाजता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीनुसार आरोपींच्या पाटील मळा भागातून मंगळवारी मुसक्या आवळण्यात आल्या. शाकिर उर्फ गोलू राशीद सय्यद (23, रा.32 खोली भुसावळ) व शाकीब उर्फ भांजा दाऊद शेख (19, रा.गौसिया नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, अयाज सय्यद, रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.