पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह ; दोन बंद घरांना टार्गेट, तिसर्या ठिकाणी प्रयत्न फसला
भुसावळ- जुन्या चोर्या उघडकीस आल्या नसताना नव्याने होणार्या चोर्या नागरीकांसह पेालिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नववर्षात चोरट्यांनी पोलिसांना सलामी देत शहरातील माणकबागेत दोन बंद घरे फोडून लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने या भागातील खळबळ उडाली आहे. शहर व बाजारपेठ पोलिसांकडून गस्त होत असलीतरी ती नावालाच होत असल्याचा उघड आरोप आता नागरीक करीत आहेत शिवाय शहरातील विविध भागात आरएफआयडी कार्ड लावण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्यानुसार पोलिस उपअधीक्षकांनी गस्तीबाबत आढावा घ्यावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.
मानक बागेत बंद घरांना टार्गेट
शहरातील मानक बाग भागात प्लॉट नंबर 45 मध्ये सेवानिवृत्त कर्मचारी भीमराज तुकाराम सुरवाडे (61) पत्नीसह राहतात. पत्नीच्या ऑपरेशनिमित्त ते पुण्याला गेले होते तर रविवारीच ते शहरात परतले मात्र गावातील नारायण नगरात सासुरवाडी असल्याने तेथे थांबल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधला. दरवाजाचे कुलूप, कडी-कोयंडा तोडत कपाटातील 35 ग्रॅम वजनाचा व एक लाख रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार, 65 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स तसेच पाच हजारांची रोकड मिळून एक लाख 85 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच राहणार्या सेवानिवृत्त भागवत दामू फेगडे यांच्याकडेही घरफोडी केली मात्र ते बाहेरगावी गेल्याने नेमका काय ऐवज गेला? हे कळू शकले नाही. चोरट्यांनी यानंतर संजीव कांबळे यांच्याकडेही चोरीचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.
पोलिस उपअधीक्षकांची धाव
चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक चंद्रकांत कुंभार व कर्मचार्यांनी धाव घेतली. जळगाव येथील श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत असून नागरीकांनी बाहेरगावी जाताना किंमती मुद्देमात घरात ठेवू नये तसेच नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे.