भुसावळात धूम स्टाईल मोबाईल लांबवणारे त्रिकूट जाळ्यात
चोरीचे पाच मोबाईल जप्त : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
भुसावळ : पादचार्याच्या हातातून धूम स्टाईल मोबाईल लांबवणार्या चोरट्यांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्रिकुटाकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त केले आहेत. संशयीताकडून भुसावळ शहर पोलीस ठाण्यासह विभागातील काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सागर राकेश आढाळे (19) व भूषण समाधान सपकाळे (दोन्ही रा.आंबेडकर नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून अन्य एका अल्पवयीन संशयीतासही ताब्यात घेण्यात आले आहे.
कोम्बिंग दरम्यान गवसले आरोपी
शनिवार, 31 रोजी मध्यरात्री बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्यानंतर संशयीत दुचाकी (एम.एच.19 डब्ल्यू.224) वरून सुंदर नगर भागातून जात असताना बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अडवत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. संशयीतानी शंकर भवानी तिवारी (60, संभाजी नगर, भुसावळ) यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. तिवारी हे 29 रोजी रात्री सव्वा आठ वाजता वरणगाव रोडवरील संभाजीनगर ते रामायण नगर दरम्यानपायी जात असताना संशयीतानी धूम स्टाईल येत 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मोबाईल चोरट्यांकडून जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, हवालदार रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली.