भुसावळात नाट्यगृहाच्या हालचाली शून्य

0
भुसावळ- शहरातील नाट्यगृहाची उभारणी करण्यासंदभात माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना आठ दिवसांपूर्वीच पत्र दिले होते मात्र आठ दिवसानंतरही याबाबत कुठल्याही हालचाली गतिमान न झाल्याने नाट्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. सत्ताधार्‍यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून नाट्यगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी भावना शहरातील नाट्यप्रेमींमधून उमटत आहे.
सत्ताबदलानंतर रखडले नाट्यगृह
नाट्यगृहाच्या कामासाठी सन 2014-15 च्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली होती. 27 ऑक्टोंबर 2015 रोजीच्या शासननिर्णयावरुन पालिकेने 1 फेब्रुवारी 2016 रोजी ठराव केला होता. भुसावळ नगरपरिषदेस सदर शासन निर्णयासोबत असलेल्या अनुसूचीतील क्रमांक सातनुसार भुसावळ नगरपालिकेला नाट्यगृहासाठी दोन कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पालिकेच्या ठरावानुसार नाट्यगृहाचे आराखडे, अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता व कामांवर देखरेख याकामी वास्तूतज्ञ नेमणूक करण्याच्या ठराव संमत केला होता. त्यानुसार निविदाही प्रसिध्द केली होती मात्र यानंतर पालिकेतील सत्ताबदल झाल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले. नाट्यगृह निर्मितीसाठी गठीत समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य म्हणून अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ व सचिव म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी नगरप्रशासन विभाग हे आहेत. यामुळे या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली होती. यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना पत्रव्यवहार करुन या रखडलेल्या कामाबाबत तत्काळ कार्यवाही करुन याबाबतच अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. सत्ताधारी व मुख्याधिकार्‍यांनी राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून नाट्यगृहाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.