प्रथितयश महाविद्यालयातील घटनेने विद्यार्थ्यांमध्ये दहशत ; जखमी युवकावर हॉटेलमध्ये वाद झाल्यानंतर काढली खुन्नस ; बाजारपेठ पोलिसांनी तीन संशयीतांना घेतले ताब्यात ; तीन संशयीतांचा कसून शोध सुरू गोदावरीत उपचार
भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या आवारात 19 वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडल्याने शहरासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर पोलिसांनी चौकशीकामी तीन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले असून तीन जण पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दहशत
शहरातील नामांकीत अशा नाहाटा महाविद्यालयाच्या आवारातच निलेश गोविंदा पवार (19, वैष्णवी नगर, भुसावळ) या तरुणासोबत सहा संशयीतांचा मंगळवादी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास वाद झाला. एकाने निलेशच्या पाठीवर चाकू मारला तर अन्य आरोपींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने तरुण रक्तबंबाळ झाला तर संशयीतांनी लागलीच पळ काढला. पाहता-पाहता वार्यासारखी ही बातमी महाविद्यालयाच्या आवारात पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवताच उपनिरीक्षक निशीकांत जोशी, प्रशांत जाधव, संजय भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगवला. जखमी निलेशवर जामनेर रोडवरील सोनिच्छावाडी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अधिक उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले.
हॉटेलमधील वादाचा आरोपींनी घेतला बदला !
समजलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री संशयीत व जखमींचा हॉटेल सुहासजवळ वाद झाला होता व एकमेकांना त्यांनी चापट मारली होती तर या वादाचा बदला घेण्यासाठी संशयीतांनी जखमीला मोबाईलवरून कुठे असल्याबाबत विचारणा केली तर जखमी हा मित्रांना सोडण्यासाठी नाहाटा महाविद्यालयाजवळ आल्याचे त्याने सांगितल्यानंतर सहा संशयीत आरोपी तेथे धडकले त्यांनी निलेशशी वाद घालत त्यास मारहाण केली तर एकाने त्याच्या पाठीत चाकू खुपसून पळ काढला.
तासाभरात संशयीत जाळ्यात
महाविद्यालयात प्रथमच झालेल्या या घटनेतील संशयीतांना अवघ्या तासाभरात पोलिसांनी हुडकून काढत ताब्यात घेतले. तरुणावरील चाकूहल्ल्याचे नेमके कारण कळाले नसलेतरी प्रेमसंबंधातील कारणातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. नाहाटा महाविद्यालय हे शहरातील नामांकित महाविद्यालय असून प्रथमच अशी घटना महाविद्यालयाच्या आवारात घडल्याचे सांगण्यात आले तर जखमी व संशयीत हे महाविद्यालयाचे विद्यार्थी नसल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. महामार्गाच्या बाजूने संबंधित महाविद्यालयात आत शिरल्याचे समजते.
संशयीत महाविद्यालयाचे नाहीत -प्राचार्य
प्राचार्य मीनाक्षी वायकोळे म्हणाल्या की, घटना कळाल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती कळवण्यात आली. संशयीत आमच्या महाविद्यालयाचे नाहीत, ते महाविद्यालयाच्या आवारात कसे आले? याबाबत शोध सुरू असून यापुढे महाविद्यालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.