भुसावळ- लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असतानाच शहरात बाहेरून पैसा तसेच मद्य न येण्यासाठी निवडणूक पथकातर्फे विविध पथकांची नेमणूक करण्यात आली असून शहरात येणार्या मार्गावर या पथकांकडून तपासणी केली जात आहे. बुधवारी स्टॅटीक पथकाने चक्क निवडणूक निरीक्षकांचे वाहन तपासले मात्र यामुळे पथकाची सतर्कतादेखील लक्षात आली.
चांगल्या कामाचा दिला शेरा
निवडणूक निरीक्षक उदय कुळकर्णी हे जामनेर येथून चालक सुनील पाटील यांच्यासह चारचाकी (एम.एच.19 सी.एफ.2759) ने भुसावळात येत असताना स्टॅटीक पथकाने नाहाटा चौफुलीवर वाहन अडवले. यावेळी टीम प्रमुख सुनील शिवपूजे, कृष्णाकुमार ठाकूर, मिलिंद देवरे, हवालदार प्रभाकर चौधरी, गजानन महाजन, कॉन्स्टेबल तुकाराम नेटके, व्हिडीओ ग्राफर प्रमुख श्याम गोविंदा आदींनी या वाहनाची तपासणी केली मात्र त्यात काहीही आढळले नाही तर गाडीची तपासणी होण्यापूर्वी काही अंतरावरच निवडणूक निरीक्षक नेमलेले पथक कशा पद्धत्तीने काम करते हे पाहण्यासाठी आधीच उतरले होते. वाहनाची तपासणी झाल्यानंतर निवडणूक निरीक्षक तपासणीस्थळी आले व त्यांनी उपस्थित टीमचे सतर्कतेबद्दल कौतुक केले तसेच टीम जवळील नोंद वहीत स्टॅटीक सर्व्हिलन्स टीम उत्कृष्ट काम करीत असल्याचा शेराही दिला.