भुसावळ- खंडव्याचा लाकूड व्यापारी शंकर पासी यास पाच लाखात लुटून भुसावळात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आठ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला बुधवारी पहाटे महामार्गावरील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली होती. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असताना नारायणसिंग गोकुळसिंग राजपूत (44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, (म.प्र.) व नाना जगन सोनी (37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), यांच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील सनावद येथे अशाच पद्धत्तीने फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अटकेतील आठही आरोपींची रविवार, 21 रोजी पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर करून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
आरोपींचे नोंदवले जाबजवाब
अटकेतील आठही दरोडेखोरांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वतंत्र जाबजवाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून त्यातील दोघांविरुद्ध सनावद (मध्यप्रदेश) येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना प्राप्त झाली आहे. लुटीतील पाच पैकी साडेतीन लाखांची रक्कम आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे.