भुसावळात पती-पत्नीची एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा

0

अपघातातील मृत भारंबे दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भुसावळ- नातेवाईकांच्या लग्नाला गेलेल्या शहरातील भारंबे दाम्पत्याचा मलकापूरजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. दोघाही मयत पती-पत्नीचे मृतदेह सोमवारी रात्री शवविच्छेदनानंतर भुसावळात आणल्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दाम्पत्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थित नातेवाईकांचे डोळेही पाणावले.

आई-वडिलांचा मृतदेह पाहताच मुलाने फोडला टाहो
भुसावळातील दर्डा भवनाजवळील रहिवासी व हितवर्धिनी पतसंस्थेचे मॅनेजर प्रकाश किसन भारंबे (57) व त्यांच्या पत्नी सुरेखा प्रकाश भारंबे (50) हे मलकापूरजवळील अनुराबाद-झोडगा येथे पत्नी सुरेखा यांच्या मामाच्या नात्यातील लग्नासाठी सोमवारी सकाळी भुसावळातून रवाना झाले होते. मंगळवारी लग्न असले तरी सोमवारी हळदीच्या कार्यक्रमासही हे दाम्पत्य हजेरी लावणार होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य महिंद्रा मॅक्सीमोने लग्न स्थळाकडे निघाले असतानाच मलकापूरजवळील रसोया कंपनीजवळ मुक्ताईनगरकडून अकोल्याकडे स्फोटकांची वाहतूक करणार्‍या कंटेनरचे टायर फुटल्याने मॅक्सीमो वाहनावर आदळल्याने वाहन चालकासह तब्बल 13 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. मयतांमध्ये भुसावळातील भारंबे दाम्पत्याचाही समावेश होता. सायंकाळी दाम्पत्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह दर्डा भवनाजवळील निवासस्थानी शीतशवपेटीत ठेवण्यात आले. या दाम्प्त्याचा मुंबईत शिक्षण घेणारा एकुलता एक मुलगा योगेश पहाटे शहरात परतल्यानंतर त्याने आई-वडीलांचे मृतदेह पाहताच टाहो फोडला. यावेळी उपस्थितानाही गहिवरून आले. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एकाचवेळी दाम्पत्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तापी नदीवरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.