भुसावळ: शहरातील यावल रोडवरील राहुल नगरासमोर विनापरवानगी रस्ता खोदून फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू असल्याची जनआधारच्या नगरसेवकांना माहिती कळताच त्यांनी धाव घेत काम बंद पाडले. शहरातील रस्त्यांची आधीच वाताहत झाली असतांना पुन्हा यावल रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे करून काम केले जात असल्याने नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी धाव घेतल्यानंतर तीव्र संताप करत आक्षेप घेतला. साईडवरील संबंधित सुपरवायझरकडे केबल टाकण्याच्या कामासंदर्भात पालिकेची कुठलीही परवानगी नसतांना अनधिकृतपणे केबल टाकली जात असल्याने मुख्याधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली. मुख्याधिकार्यांनी या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर अनधिकृतरित्या केबल टाकली जात असल्याचे उघड झाल्याने ट्रक, ट्रॅक्टर-टँकर व लाखो रुपयांची मशिनरी जप्त करीत काम बंद केले.
चौकशी करून कारवाई करणार
एल अॅण्ड टी कंपनीतर्फे ऑप्टिकल फायबर केबलचे काम पालिकेची कुठलीही परवानगी न घेता सुरू असल्याने आपण मशिनरी जप्त केली आहे. कंपनीचे संबंधित आल्यानंतर अधिक चौकशी करून कारवाईची दिशा ठरवली जाईल. तूर्त गुन्हा दाखल करीत नसल्याचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, रवी सपकाळे, ईम्तीयाज शेख शब्बीर, हाजी पिंजारी, संगीत खरे, बाळा सोनवणे, ऋषी शुक्ला, दीपक दीपके, आनंद चौथमल, कुणाल अहिरे, नरसिंग तायडे, राहुल बोरसे, सिकंदर खान, साजीद भाई, किरण तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.