भुसावळ : तब्बल वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे प्रशासनाने बुधवार, 29 जूनपासून सर्वसाधारण (जनरल) तिकीट सुविधा सुरू केल्याने प्रवाशांच्या गोटात मोठा आनंद दिसून आला. जंक्शन स्थानकावर पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल सात तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. पहिल्याच दिवशी दोन हजार 533 तिकीटांची विक्री होवून त्यातून रेल्वेला 16 लाखांचे भरघोस उत्पन्न मिळाले. कोरोना काळात रीझर्व्ह ट्रेन धावत असल्याने प्रवाशांना वाढीव भूर्दंडाचे आरक्षण तिकीट काढून प्रवास करावा लागत होता मात्र आता जनरल तिकीट सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांनी युटीएस अॅपलाही प्रतिसाद दिला तर एटीव्हीएमवरही तिकीट काढण्यासाठी गर्दी उसळली होती.
भुसावळात रेल्वे प्रवाशांसाठी सात तिकीट खिडक्या सुरू
रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे प्रवाशांसाठी तब्बल सात जनरल तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर रेल्वे प्रवाशांनी तिकीट काढायला रेल्वे स्थानकावर गर्दी केली. मुख्य प्रवेशद्वाराकडील चार तर केला साईडींगकडील तीन अश्या सात तिकीट खिडक्यांमधून प्रवाशांना तिकीटे देण्यात आली तर मुंबई पॅसेंजर, इटारसी पॅसेंजर यासह अन्य मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी देखील प्रवाशांनी जनरल तिकीट काढून प्रवास केला. प्रवाशांची गर्दी पाहता आरपीएफ जवानांनी तिकीट खिडकी, मुसाफिर खाना या भागात गस्त घातली. आरपीएफ निरीक्षक आर.के.मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जनरल डबे प्रवाशांच्या गर्दीने फुलले
तब्बल अडीच वर्षानंतर गाड्यांनाही जनरल तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर जनरल डबे जोडण्यात आल्याने प्रवाशांची या डब्यांमध्ये खचाखच गर्दी झाली होती. युपी, बिहार, मध्यप्रदेश, छतीसगड या भागातून येणार्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून आली.