भुसावळात पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी

0

तीन प्रभागांना टंचाईची झळ ; पाणीपुरवठ्याच्या दिवशीच झालेल्या प्रकाराने गैरसोय

भुसावळ- तब्बल आठ दिवसांनंतर होणार्‍या पाणीपुरवठ्याच्याच दिवशी पाईप लाईन फुटल्याने नागरीकांना भटकंती करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून महामार्गावरील हॉटेल सुहासजवळ जेसीबीचा धक्का लागल्याने सिमेंट-काँक्रिटची पाईप लाईन फुटल्याने बुधवारी हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली तर खडकारोडसह, गडकरीनगर आदींसह तीन प्रभागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने सुमारे 18 हजार नागरीकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित रहावे लागल्याने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तातडीने पाईप लाईनची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

जेसीबीचा धक्का लागल्याने फुटली पाईप लाईन
हॉटेल सुहासजवळ झालेल्या प्रकाराची माहिती कळताच पाणीपुरवठा विभागाचे सभापती राजेंद्र नाटकर, अभियंता गणेश लाड आदींनी पाहणी केली. महामार्ग विभागाच्या कामामुळे ही पाईपलाइन फुटल्याने संबंधीत ठेकेदाराने ती जोडून द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून महामार्ग विभागानेही होकार दिला आहे. आधीच आठ दिवसानंतर येणारे पाणी बुधवारी येणार असताना झालेल्या प्रकाराने महिलावर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरण दोन दिवसात पाणीपुरवठा लाईनची जोडणी करणार असलेतरी पाण्यासाठी पुन्हा नागरीकांना भटकंतीची वेळ आली आहे.

जोडणीची प्रक्रिया क्लीष्ट ; दोन दिवसात दुरूस्ती
पालिकेची फुटलेली पाईपलाईन 14 इंची व सिमेंट काँक्रीटची असलीतरी तसा पाईप आता कुठेही मिळत नाही त्यामुळे फुटलेल्या पाईपच्या ठिकाणी पीव्हीसी पाईप लावावा लागणार असून ही प्रक्रिया क्लीष्ट असल्याने किमान दुरुस्तीला दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.