भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची मंगळवारी नासाडी झाली. एकीकडे शहरवासीयांना टंचाईचे चटके सोसावे लागत असताना दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी झाल्याने नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, पालिक प्रशासनाने पाईप लाईन दुरुस्तीसाठी खड्ड्यातून पाणी बाहेर काढल्याने हे पाणी रस्त्त्यावर आल्याचे सांगत पाण्याची नासाडी झाली नसल्याचे सांगितले.
रस्त्यावर आले पाणी
नाहाटा महाविद्यालयाजवळ 33 वर्ष जुना व 19.68 लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ असून अर्ध्या शहराला या जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन मंगळवारी सकाळी फुटल्यानंतर मात्र थेट दीनदयात नगरापर्यंत पाणी आल्याने सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. शहरवासी आधीच पाणीटंचाईने हैराण असून दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याने पालिका प्रशासनाने दखल घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
पाण्याची नासाडी नाही -मुख्याधिकारी
नाहाटा महाविद्यालयाजवळील पाणीपुरवठा करणार्या पाईप लाईन लिकेज असल्याने मंगळवारी दुरुस्ती करण्यात आली. लिकेज असलेल्या भागात खड्डे तयार होवून त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मोटारद्वारे हे पाणी उपसण्यात आल्याने हे पाणी रस्त्यावर आले मात्र पाण्याची नासाडी झालेली नाही, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले. नाहाटा महाविद्यालयाच्या जलकुंंभाला गळती लागली नसल्याचा ठोस दावाही त्यांनी केला.