भुसावळात पाण्यासाठी रास्तारोको

0

इतिहासातील पहिलीच घटना ; आंदोलक ताब्यात

भुसावळ : शहरात तब्बल नऊ दिवसांनंतरही पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या सिंधी कॉलनी भागातील पुरुष व महिलांनी एकत्र येत मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वारावर अचानक रास्तारोको केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भुसावळच्या इतिहासात पाण्यासाठी रहिवाशांनी प्रथमच रास्तारोको केल्याची ही घटना असल्याचे मानले जाते. सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईची निर्माण झाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, सिंधी कॉलनीतील नागरीकांनी रास्तारोको केल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत रास्तारोकोचा प्रयत्न हाणून पाडला. याप्रसंगी आंदोलन करणार्‍या आठ ते दहा पुरुष व महिलांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले.

नऊ दिवसांपासून टंचाईच्या झळा
हतनूर धरणातून आवर्तन सुटण्यास विलंब झाल्याने शहरवासीयांना तब्बल नऊ दिवसांपासून टंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहराचा पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत न झाल्याने नागरीकांना मंगळवारी नाईलाजाने रास्तारोको करण्याची वेळ आल्याने पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला.