काळे झेंडे दाखवत केली होती राजीनाम्याची मागणी : जमावबंदीचे उल्लंघ केल्याने गुन्हा
भुसावळ- फैजपूर येथील कृषी शिबिरासाठी जात असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळातील भारीपा कार्यकर्त्यांनी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवल्याने सुरक्षा यंत्रणांची शहरात चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने व चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करीत विविध मागण्यांसंदर्भात फलकही झळकावले. अचानक झालेल्या या प्रकारानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले.
13 आंदोलकांवर शहर पोलिसात गुन्हे
पालकमंत्र्यांचा ताफा अडवणार्या भारीपा बहुजन महासंघाच्या 13 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर शहर पोलिसात जमावबंदी आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली व सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, बाळा पवार, निलेश ईखारे, संजय सुरळकर, गणेश इंगळे, विद्यासागर खरात, जयराज आव्हाड, सोनु वाघमारे, निलेश जाधव, विनय सोनवणे, आकाश वानखेडे, लक्ष्मण सरदार, भूषण आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजय कंखरे करीत आहेत.
अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करावी, जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळावा, शेती मालाला योग्य हमी भाव द्यावा यासह सर्वसामान्यांच्या ज्वलंत समस्या सोडवाव्यात यासाठी भारीपातर्फे पालकमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दर्शवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.