भुसावळात पालिकेची धडक कारवाई : थकबाकीदार 28 गाळ्यांना सील
सील ठोकताच पावणेसात लाखांची वसुली : मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या धडक कारवाईने उडाली : कारवाई सुरूच राहणार
भुसावळ : मार्च एण्डच्या अनुषंगाने भुसावळ पालिकेने वसुलीवर भर दिला आहे मात्र वारंवार आवाहन करूनही थकबाकीदार पालिकेची थकबाकी भरत नसल्याने शनिवार, 6 रोजी पालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील तब्बल 28 गाळ्यांना सील ठोकल्याने व्यापार्यांच्या गोटात खळबळ उडाली. 27 व्यापार्यांनी लागलीच थकबाकी भरल्यानंतर पथकाने सील उघडले तर अन्य व्यावसायीक सोमवारी व मंगळवारी थकबाकी भरणार असून त्यानंतरही थकबाकी भरण्यात न आल्यास धडक कारवाई सुरूच राहील, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.
शहरातील सर्वच व्यापारी संकुलात कारवाई
मार्च एण्डच्या अनुषंगाने थकबाकीदारांविरुद्ध पालिकेकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून पथकाने शहरातील म्युन्सीपल मार्केट, स्व.छबिलदास चौधरी कपडा मार्केट, बाबा तुळसीदास उदासी मार्केट, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, डी.एस.हायस्कुल जवळील कॉम्प्लेक्स आदी संकुलातील थकबाकीदार असलेल्या 28 गाळ्यांना सील ठोकले मात्र व्यापार्यांनी सील ठोकताच थकबाकी भरल्याने 27 गाळ्यांचे सील उघडण्यात आले व यापोटी एकूण सहा लाख 75 हजारांची थकबाकी जमा झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळील दुकानदाराने थकबाकी न भरल्याने सील कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, लिपिक गोपाळ पाली, लिपिक अनिल भाकरे, मोहन भारंबे, धमेंद्र खरारे, जयकुमार पिंजाणी आदींच्या पथकाने केली. दरम्यान, रविवारीदेखील पालिकेची मोहिम सुरू राहणार असून थकबाकीदारांनी थकबाकी भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.