भुसावळात पालिकेच्या मैदानाचा व्यावसायीक वापर

0

ठरावाला केराची टोपली ; सुट्यांमध्ये चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण

भुसावळ- पालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा (डी.एस.ग्राऊंड) व्यावसायीक वापर न करण्याचा पालिका सभागृहात ठराव झाला असतानाही पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी या ठरावाला तिलांजली देत आनंद मेळाव्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने शहरातील विद्यार्थ्यांसह चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शहरातील उद्याने आधीच भकास झाली असताना एकमेव डी.एस.ग्राऊंडच्या मैदानाची खेळाडूंना उपलब्धी असताना हा आनंदही हिरावून घेतला गेल्याने क्रीडा प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. पालिकेला आनंद मेळाव्याच्या माध्यमातून अल्प उत्पन्न मिळत असलेतरी त्यानंतर होणारी मैदानाची वाताहत व त्यावरील खर्च मात्र दुप्पट असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ शहरवासीयांमधून उमटत आहेत.

पारदर्शकतेचा ढिंढोरा नावालाच
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान हे एकमेव पालिकेच्या मालकीचे मोठे मैदान आहे. या मैदानावर सकाळी मॉर्निंग वॉकपासून गजबज असते. उन्हाळी सुट्यांमध्ये क्रिकेट व अन्य खेळांसाठी खेळाडू येथे येतात मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून सर्वाधिक वापर होणार्‍या उन्हाळ्याच्या काळातच हे मैदान भाडे तत्वावर दिले जात आहे. या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून आनंद मेळा सुरू आहे. पालिकेला काही प्रमाणात उत्पन्न मिळत असले तरी राजकीय लोकप्रतिनिधींनाच अधिक आर्थिक फायदा होत असल्याची टिका सुज्ञ जनतेतून होत आहे. मुलांच्या खेळण्यासाठीचे मैदान थेट व्यवसायीक तत्वावर उपलब्ध करुन दिले जाते. पारदर्शकता आणि विकासाची कास असल्याचा ढिंडोरा पिटविणार्‍या पालिकेतील सत्ताधार्‍यांना ही बाब निदर्शनास येत नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने विरोधकांनी उपस्थित केला आहे. सत्ताधार ीव पालिका प्रशासन या कारणाने वारंवार टिकेचे धनी होत असतानाही हा व्यावसायीक वापर कोणत्या प्रलोभनातून सुरू आहे अ असा प्रश्न सुज्ञ शहरवासीयांना पडला आहे.

चांगल्या ठरावाला सत्ताधार्‍यांकडून हरताळ -उमेश नेमाडे
उन्हाळी सुट्यांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांसह खेळाडूंना मैदानाचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण व्यावसायीक वापर बंद करून या मैदानाचा केवळ खेळासाठीच वापर व्हावा याबाबत नगराध्यक्ष पदावर असताना ठराव केला होता परंतु उद्देशाला सत्ताधारी हरताळ फासत आहेत. व्यावसायीकाकडून अल्प उत्पन्न मिळते मात्र त्या प्रमाणात खेळाच्या मैदानाची त्या उत्पन्नाच्या दुप्पट नासधूस होते व अटी-नियमांचे पालनदेखील केले जात नाही, अशी भावना माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केली.