भुसावळात पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईला मुहूर्त !

0

स्थायी समितीच्या सभेत निविदा मंजुरीनंतर कामाला होणार सुरुवात

भुसावळ- शहरातील नाल्यांची तब्बल चार वर्षांपासून सफाई रखडली असतानाच सत्ताधार्‍यांनी बुधवारी नाल्यांची पाहणी करून आढावा घेतला. लवकरच स्थायी समितीच्या सभेत नालेसफाईच्या विषयाला मंजुरी देऊन आठवडाभरात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिड वर्षांपासून सत्तेवर आलेल्या सत्ताधार्‍यांनी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचा काढलेला मुहूर्त जनतेच्या संतापात भर घालणारा आहे. शहरातील सर्वच भागातील नाले ओसंडून वाहत आहे तर महिनाभर सतत काम सुरू ठेवलेतरी त्यातील घाण निघणार नाही? अशी स्थिती असताना 15 दिवसात नालेसफाई होणार कशी ? असा प्रश्न जनआधारच्या विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

नाले ओसंडले ; जनता संतप्त
शहराच्या विविध भागातील गटारी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सांडपाण्याच्या गटारी व नाले तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई करणे गरजेचे होते मात्र असे असतानाही केवळ वेळ काढूपणा सत्ताधारी व पालिका प्रशासनाने केल्याची टीका जनमाणसातून होत आहे. पालिकेच्या या आडमुठ्या भुमिकेमुळे शहरातील नाल्याकाठी राहणार्‍या नागरीकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती आहे.

एमआयएमचा आंदोलनाचा इशारा
गुरुवारपासून मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे मात्र असे असतानाही पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी मुस्लीम बहुल भागात स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत कुठलीही तयारी न केल्याने या भागातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जाम मोहल्ला, काझी प्लॉट, गौसीया नगर, ताज नगर, खडगाव रोड, ग्रीन पार्क, मिल्लत नगर
आगाखान वाडा, नसरवांजी फाईल, बत्तीस खोली आदी भागात दहा-दहा दिवस पाणी येत नाही तसेच स्वच्छतेअभावी गटारी ओसंडून वाहत आहेत. पालिका प्रशासनाने गुरुवारपर्यंत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा एमआयएमचे शहराध्यक्ष फिरोज शेख व शहराध्यक्ष अशरफ तडवी यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिला. नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करू शकत नसाल तर किमान टँकर पाठवून या भागातील नागरीकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

लवकरच नालेसफाई होणार -नगराध्यक्ष
शहरातील नाल्यांच्या सफाईला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. सहा वर्षांपासून गटारी स्वच्छ न झाल्याने त्यांचीही स्वच्छता केली जाणार असून त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. बंधार्‍यात पाणी नसल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला मात्र आता रोटेशन प्रमाणे पाणीपुरवठा होत असल्याचे भोळे म्हणाले.