भुसावळात पावसाळ्यातही पालिकेची नाले सफाई मोहीम

0

मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने नाले सफाईला मिळतेय संधी

भुसावळ- नगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईला प्राधान्य देणे आवश्यक असते मात्र पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाले सफाईला उशीरा सुरूवात करण्यात आल्याने जुलै महिन्यातही नाले सफाई सुरूच आहे. सुदैवाने शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने पालिकेच्या नाले सफाईला चांगली संधी मिळत आहे.

जुलै महिन्यातही नालेसफाई संथगतीने
पावसाच्या पाण्यामुळे शहरातील नाले व मोठ्या स्वरूपाच्या गटारी तुंबून नाल्यालगतच्या रहिवाशांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी आपत्ती जलव्यवस्थापन विभागाकडून नगरपालिकेला पावसाळ्यापुर्वी शहरातील मोठ्या स्वरूपाच्या गटारी व नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थीत होण्यासाठी नाले व गटारींची सफाईची सूचना देण्यात आली होती.त्यानुसार पालिका प्रशासनाने मे महिन्यात नाले सफाईला प्राधान्य देणे आवश्यक होते मात्र पालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाई व गटारींच्या स्वच्छतेला मे महिन्याच्या अखेरीस प्रारंभ केला तसेच नाले सफाईला पाहिजे त्या प्रमाणात जादा यंत्रणा नसल्याने नाले सफाई संथगतीने होत आहे. यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतही शहरातील नाले सफाई सुरूच आहे.

सुदैवाने मोठ्या प्रमाणात पाऊस नाही
शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास अनेक गटारी व नाले तुंबून नाल्यालगतच्या वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव होवून रहिवाशांना नुकसानीला सामोरे जावे लागते मात्र यंदा जुलै महिना अखेरीस येवूनही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पालिका प्रशासनाला नालेसफाईला चांगली संधी मिळत आहे. असे असलेतरी पालिका प्रशासनाने जादा प्रमाणात यंत्रणा सक्रीय करून शहरातील नाले सफाईला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा सुर उमटत आहे.