भुसावळात पुन्हा आढळले डेंग्यूचे रुग्ण

0

अस्वच्छतेमुळे नागरीकांचा संताप अनावर ; उपाययोजना शून्य

भुसावळ- शहरात सातत्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छतेचे उपाययोजना होत नसल्याने डेंग्यूचा आजार बळावत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. शहरातील खडकारोड भागातील दोन तरुणांना डेंग्यूची लागण झाली असून यापूर्वी डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. खडका रोडवरील दोघांपैकी एकास जळगाव येथे तर दुसर्‍यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मात्र संभाव्य उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

खडका रोड भागातील दोघांना डेंग्यू
शहरातील खडका रोड भागातील बी. झेड. हायस्कूल जवळील रहिवासी अबरार खलिद मनियार (19) व समीर पिंजारी (29) या तरुणांना सोमवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तर अबरारवर जळगाव येथील अ‍ॅपेक्स रुग्णालयात तर समीरवर शहरातील एक्सल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे व्यापक प्रमाणात कंटेनर सर्वेक्षण केले जात नाही, तसेच डेंग्यूबाबत नागरिकांना प्रबोधन होत नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचा उपद्रव वाढत आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

रोझोद्याच्या बालिकेवर खाजगीत उपचार
शहरातील डॉ. रेखा पाटील यांच्या रुग्णालयात रोझोदा, ता.रावेर येथील धनश्री सुधारक कुंद या सात वर्षाच्या बालिकेवर उपचार सुरू आहेत. सावदा येथील श्री. स्वामी समर्थ लहान मुलांच्या हॉस्पीटलमधून प्राथमिक उपचार घेवून या बालिकेस उपचारार्थ भुसावळ दाखल करण्यात आले आहे. या बालिकेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.