भुसावळात पूर्व वैमनस्यातून तलवार हल्ला ; एक गंभीर

0

नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवरील घटना ः सात आरोपींविरुद्ध गुन्हा

भुसावळ- भाजपाचे सत्ताधारी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या जळगाव रस्त्यावरील काच बंगल्यावरील विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आलेल्या 40 वर्षीय चालकावर पूर्व वैमनस्यातून सिनेस्टाईल तलवार हल्ला झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विकास देविदास सपकाळे (40, भोई नगर, भुसावळ) असे जखमी इसमाचे नाव आहे. हल्ल्यानंतर विहिरीवर जमलेल्या चालकांची पळापळ झाली तर चेहर्‍याला रूमाल बांधून आलेले हल्लेखोर तीन दुचाकींद्वारे पसार झाले.

भर दिवसा झाला तलवार हल्ला
सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका पती असलेल्या सतीश सपकाळे यांच्याकडे विकास सपकाळे पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कामास आहेत. शहराला टंचाईचे चटके जाणवत असल्याने नगराध्यक्षांच्या जळगाव रोडवरील काच बंगल्यावरील विहिरीतून शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारासही सपकाळे हे टँकर घेवून विहिरीवर पाणी भरण्यासाठी आले असताना तोंडाला रूमाल बांधलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी सपकाळे यांना बाहेर येण्यास सांगितले तर सपकाळे यांनी हल्लेखोरातील एकाला त्याच्यासह वडिलांचीही माफी मागण्यास सायंकाळी येतो, असे सांगितले मात्र हल्लेखोरांचे समाधान न झाल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या चालकांना तेथून निघून जाण्याचे सांगितले. सपकाळे बाहेर येत नसल्याने एका हल्लेखोराने त्यांच्या कानशीलात लगावली तर अन्य दोघांनी कमरेला लावलेल्या तलवारी काढत सपकाळे यांच्या डोक्यावर तसेच दोन्ही हातांसह पायावर सपासप तलवारीचे पाच वार केले.

ट्रॅक्टर चालकांनी ठोकली धूम
सपकाळे यांच्यावर सात हल्लेखोरांकडून तलवारीने हल्ला होत असताना एका हल्लेखोरांनी या चालकांनाही ठोकून काढा, असे सांगताच ट्रॅक्टर चालकांनी जीव मुठीत घेवून मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह गिरीश महाजन, सतीश सपकाळे यांना हल्ल्याची कल्पना देण्यात आल्यानंतर शहर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. हल्लेखोरांनी ओळख पटू नये यासाठी तोंडाला रूमाल बांधले होते तर काच बंगल्याच्या दर्शनी भागातच त्यांनी तीन दुचाकी लावल्या होत्या व हल्ल्यानंतर ते दुचाकीने पसार झाले.

घटनास्थळी आढळला रक्ताचा सडा
काच बंगल्याच्या मागील बाजूस पाणीपुरवठा करणारी मोठी विहिर असून तेथे सपकाळे पाणी भरण्यासाठी आले असतानाच हल्लेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा आढळला. सपकाळे यांच्या डोक्यावर तलवारीने दोन वार करण्यात आले तसेच दोन्ही हातांवर तसेच पायांवरही तीन वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हल्ल्याची माहिती कळताच सतीश सपकाळे व गिरीश महाजन यांनी जखमी कोळी यांना भुसावळ नगरपालिका रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

निष्क्रीय पोलिस यंत्रणेमुळे वाढली गुन्हेगारी
गल्ली ते दिल्ली सत्ता असलेल्या भाजपा पक्षाच्या नगराध्यक्षांच्या काच बंगल्यावरच जावून हल्लेखोरांनी हल्ला चढवल्याने भुसावळातील गुन्हेगारीने किती डोके वर काढले आहे याचा प्रत्यय आहे. भुसावळातील गुन्हेगारी ठेचून निघण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. गेल्या आठवडेभरात बसमधून दागिने चोरी, घरफोडी, धूम स्टाईल चैन स्नैचिंग यासारख्या घटना सातत्याने घडत असताना पोलिस यंत्रणा वाढती गुन्हेगारी थोपवण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे तर यापूर्वीही डी.एस.महाविद्यालयाच्या पटांगणावर प्रेम प्रकरणातून चाकू हल्ला झाल्याची तसेच हुडको कॉलनीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून झाल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा हल्ला झाल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.

सहा.पोलिस अधीक्षकांनी नोंदवला जवाब
भुसावळातील तलवार हल्ल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह कर्मचार्‍यांनी गोदावरी रुग्णालयातील आयसीयु कक्षात जावून जखमी सपकाळे यांचा जवाब नोंदवला. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा जवाब सपकाळै यांनी दिला असून संशयीत म्हणून मुकेश भालेराव, जितू भालेराव, अमोल चौधरी, भावेश दंडगव्हाळ, कांतीलाल दंडगव्हाळ यांच्यासह अन्य दोघा अनोळखींचा समावेश असल्याचे सांगितल्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे म्हणाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले.

पालिका बंब तोडफोड प्रकरणातही संशयीताचा समावेश
सपकाळे यांच्या हल्ला करणार्‍या जितू भालेरावसह भावेश दंडगव्हाळ व अन्य संशयीतांनी गत महिन्यात 24 एप्रिल रोजी गोपाळ नगरातील पालिकेच्या कार्यालयातून बंब पळवण्याचा प्रयत्न केला होता शिवाय बंबाच्या काचा फोडत पितळी नोझल लांबवले होते. या गुन्ह्याप्रकरणी शहर पोलिसात सचिन अरविंद भालेराव (18, श्रीनगर, भुसावळ), भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (23, शिव कॉलनी, भुसावळ) व सचिन मनोहर कोळी (24, सूर्यवंशी, श्रीनगर, भुसावळ), जितू शरद भालेराव (24, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ), गौरव बढे, विशाल दिलीप सूर्यवंशी (रा.कोळीवाडा, भुसावळ) व चेतन उर्फ गोलू दिलीप रडे (रा. जुना सातारा, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवून सर्व आरोपींना अटकही करण्यात आली होती. जखमी सपकाळे व आरोपींमध्ये मैत्री असल्याने व पालिकेच्या फायर फायटर प्रकरणात कुठल्यातरी कारणानेच वाद झाल्यानेच शनिवारचा हल्ला झाल्याचे समजते.