भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : चार वॉण्टेड आरोपी जाळ्यात
सूर्यवंशी बंधूंना अटक : 58 समन्सची बजावणी : मास्क न लावणार्या 36 जणांवर कारवाई : आठ बेलेबल वॉरंटची बजावणी
भुसावळ (गणेश वाघ) : शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शनिवारी मध्यरात्री भुसावळ शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात वरणगाव पोलिसांना हव्या असलेल्या दोन तर लोहमार्ग पोलिसांना हव्या असलेल्या दोन संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिसांसह लोहमार्ग पोलिसांना प्रथमच या कोम्बिंगमध्ये सहभागी करून पाच पथकांद्वारे शहरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंगमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
सूर्यवंशी बंधूंना अटक
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे बंधू आनंत भागवत सूर्यवंशी यांना वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. संशयीतांना शनिवार, 13 रोजी भुसावळ न्यायालयातील न्या.मानकर यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस प्रशासनातर्फे पर्यवेक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे व सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी बाजू मांडली तर संशयीत आरोपींतर्फे अॅड.जगदीश कापडे, अॅड.चरण सिंग, अॅड.मतीन अहमद यांनी युक्तीवाद केला.
कोम्बिंगमध्ये अशी झाली कारवाई
नॉन बेलेबल सहा वॉरंटची अंमलबजावणी
सहा हद्दपार आरोपींची चौकशी मात्र एकही शहरात आढळला नाही
58 समन्सची पोलिसांनी केली बजावणी
85 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी
मास्क न लावणार्या 36 नागरीकांवर दंडात्मक कारवाई
रात्री दहा वाजेनंतर विनाकारण बाहेर फिरणार्या व कागदपत्रे न बाळगणार्या 26 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
यांनी राबवले शहरात कोम्बिंग
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात बाजारपेठचे सहा.अधीक्षक अर्चित चांडक, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तीन सहाय्यक निरीक्षक तसेच 15 कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच दोन सहा.पोलिस निरीक्षक व 10 कर्मचारी तसेच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज सरडे यांच्यासह दोन अधिकारी व 10 कर्मचारी तसेच आरसीपीच्या दोन पथकांनी शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. बाजारपेठ हद्दीत तीन तर शहर हद्दीत दोन पथकांद्वारे मोहिम राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.