भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग ; दोघे जाळ्यात
भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांचे कोम्बिंग : गुन्हेगारांच्या उरात भरली कारवाईने धडकी
भुसावळ : शहर व बाजारपेठ व तालुका पोलिस ठाणे हद्दीत पोलिस प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवत दोन संशयीतांच्या मुसक्या आवळत 63 समन्सची बजावणी करीत 34 वॉरंटची बजावणी केली. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात दोन्ही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांसह कर्मचारी कोम्बिंगमध्ये सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी 34 अटक वॉरंटची बजावणी करीत 11 जामीन वॉरंट तर 63 समन्स बजावले.
गोपनीय पद्धत्तीने पोलिसांचे कोम्बिंग
शहरात शुक्रवारी रात्री डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी साडे नऊच्या सुमारास शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांना पोलिस ठाण्यात बोलावून मोबाइल कॉन्फरन्सद्वारे सर्वांना कोम्बिंगच्या सूचना केल्या. हिस्ट्री सिटर, हद्दपार, अटक वॉरटसह वेगवेगळ्या गुन्ह्यात हवे असलेल्या संशयीताचा शोध घेण्याबाबात सूचना करण्यात आल्या. रात्री 11 वाजता तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ऑल आऊट मोहिम राबविण्यास सुरूवात केली. तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दित एकाच वेळी ही मोहिम राबविण्यात आली.
यांचा कोम्बिंगमध्ये सहभाग
बाजारपेठ पोलिस ठाण्याते निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अमोल पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश भोये, फौजदार महाजन, फौजदार अंबादास पाथरवट तसेच सर्व पोलीस स्टेशन मधील पोलिस व आरसीपी प्लॉटूनचे जवान या मोहिमेत सहभागी झाले होते.
दोन संशयीतांना अटक
शहरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरणार्या नितीन रवींद्र बाविस्कर (रा. श्रीराम नगर, भुसावळ) याला श्रीराम नगर परीसरातून तर समीर शहा शरीफ शहा (रा.पापा नगर, भुसावळ) यास अटक करून त्यांच्या विरूध्द कमल 122 नुसार गुन्हा दाखल केला. दिनदयाल नगरात गिरीष गोकुळसिंग जोहरी हा तलवार बाळगतांना मिळून आल्याने त्याच्याविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दारू पिऊन फिरणार्यांवर कारवाई
ऑल आऊट मोहिम राबवली जात असतांना सिंधी कॉलनी व जामनेर रोडवर फिरणार्या नितीन कांडेलकर (रा. कृष्णा नगर, भुसावळ) व किशोर सपकाळे (रा.कृष्णा नगर, भुसावळ) हे दोन्ही जण रात्री दारू पिऊन संशयीतरित्या फिरतांना मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.