भुसावळात अवैध वाहतुकीमुळे एस.टी.चे चाक तोट्यात :बसस्थानकाबाहेरून प्रवाशांची पळवा-पळवी : वाहतूक शाखेत सक्षम सहा.निरीक्षकाची व्हावी नियुक्ती
भुसावळ : शहरात पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने अवैध वाहतुकीला अक्षरशः ऊत आला आहे. पोलिसांदेखत प्रवाशांची जनावरांप्रमाणे वाहतूक होत असताना यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य दुचाकीस्वारांनी नियम मोडल्यानंतर त्यांना कायद्याचा बडगा उगारून दंडाची आकारणी केली जात आहे. संवेदनशील असलेल्या शहरात शहर वाहतूक शाखा स्वतंत्र असलीतरी या शाखेत स्वतंत्र सक्षम सहाय्यक पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता असताना उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्याकडे शहर वाहतूक शाखेची धूरा सोपवण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांनी या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक
भुसावळ बसस्थानकाच्या किमान 200 मीटर परीसरात खाजगी वाहनांनी प्रवाशांची वाहतूक करू नये, असा नियम असलातरी अवैध वाहतूकदारांना शहर वाहतूक शाखेच्या लाभलेल्या छुप्या आशीर्वादाने वाहनधारकांनी नियम धाब्यावर बसवले आहेत. भुसावळातून फैजपूर, यावल, रावेर तर जामनेर, वरणगाव यासह लगतच्या गावांमध्ये ओमनी, अॅपे रीक्षा, टाटा मॅजिक वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाते मात्र वाहतूक करणारी बहुतांश वाहने कालबाह्य झाली आहेत तर अनेकांकडे परमीटच नाही मात्र असे असताना यंत्रणा उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत असताना सर्वसामान्यांना आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
खाजगी वाहनाचा सिलिंडरमध्ये सर्रास वापर
खाजगी वाहनांमध्ये सर्रासपणे खाजगी सिलिंडरचा वापर केला जात आहे मात्र कारवाई करण्याची धमकच यंत्रणेत नाही. शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा असून या शाखेकडे केवळ वाहनधारकांना शिस्त लावण्यासह शहराची वाहतूक सुरळीत करण्याशिवाय दुसरे कामच नाही मात्र असे असतानाही बसस्थानकात अवैध वाहतूकदारांनी ठिय्या मांडल्यानंतर दररोज होणारी कोंडी फोडण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असताना एस.टी.चालकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना मनस्ताप सोसल्याशिवाय पर्याय नाही.
पोलिस ठाण्यासमोरूनच चालते अवैध वाहतूक
विशेष म्हणजे अवैध वाहतूकदारांवर कारवाई करण्याची जवाबदारी शहर वाहतूक शाखेसोबतच उपप्रादेशिक परीवहन विभागाचीदेखील आहे मात्र संबंधित यंत्रणेचे अधिकारी शहरात आल्यानंतरही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जामनेर, यावल, रावेर, फैजपूरकडे अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणारी वाहने बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्यासमोरून राजरोसपणे चालतात मात्र अधिकार्यांकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सक्षम सहा.वाहतूक निरीक्षक नेमण्याची गरज
भुसावळ शहर वाहतूक शाखेत सध्या उपनिरीक्षकांकडे सहा.निरीक्षकांचा पदभार सोपवण्यात आला आहे मात्र शहरातील विविध वर्दळीच्या भागात होणारी वाहतूक कोंडी तसेच बसस्थानकातील कोंडी फोडण्यासह अवैध वाहतूकदारांवर धडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र सक्षम सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी या संदर्भात दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत.