डीजे वाहन बेकायदा मॉडीफाईड ; आज आरटीओ अधिकारी करणार कारवाई
भुसावळ : शहरातील डी.जे.चालकांनी बेकायदेशीरीत्या वाहने मॉडीफाईड केल्याने त्यांच्यावर भुसावळ पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत पहिल्या दिवशी सोमवारी आठ वाहने जप्त केली. ही वाहने जप्त केल्याने डीजे चालकांमध्ये घबराट पसरली आहे. कारवाईच्या भीतीने अनेकांनी वाहने शहराबाहेर हलवली आहेत. मंगळवारी जळगाव आरटीओ विभागाच्या अधिकार्यांच्या ताब्यात ही वाहने देवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
डीजे वाहन बेकायदा मॉडीफाईड
सूत्रांच्या माहितीनुसार आरटीओ विभागाची परवानगी न घेता डीजे वाहने बेकायदा मॉडीफाईड (वाहनाच्या आकारात बदल) केल्याप्रकरणी जळगाव पोलिस अधीक्षकांनी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक राजेंद्र परदेशी यांना नियुक्त केले होते. सोमवारी परदेशी यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील विविध डीजे व्यावसायीकांकडील आठ वाहने जप्त केली. ही मंगळवारी आरटीओ विभागाच्या अधिकार्यांकडे देण्यात येणार असून वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर दंड केला जाणार आहे. अनेक डीजे चालकांनी आपापली वाहने शहराबाहेर कारवाईपासून वाचण्यासाठी हलवली असून या वाहनांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेला बंदी असलीतरी काहींनी डीजे वाजवण्यास शांतता समितीच्या बैठकीतही परवानगी मागितली होती मात्र डीजेला परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे आता विसर्जन मिरवणुकीत केवळ पारंपरीक वाद्ये वाजवली जातील, अशी शक्यता आहे.