भुसावळात पोलिस लाईनीतील पाच वाहने आगीत खाक

0

लाखोंचे नुकसान ; दुचाकी, अ‍ॅटोरीक्षासह मालवाहू गाडीचा कोळसा

भुसावळ- जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांना मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. या आगीत दुचाकी, अ‍ॅटोरीक्षासह मालवाहू गाडी जळाल्याने केवळ घटनास्थळी लोखंडी सांगाडाच शिल्लक राहिला. आगीची नेमके कारण कळू शकले नसलेतरी रीक्षातील हंडीच्या स्फोटामुळे आग लागल्याचे समजते.

गुन्ह्यातील वाहने झाली खाक
आरपीडी रोडवरील पोलिस लाईन असून तेथेच असलेल्या जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त वाहने ठेवण्यात आली आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या वाहनांना आग लागली. सुरुवातीला गॅसवरील रीक्षातील हंडीचा स्फोट झाल्याने आग भडकली तर पाहता-पाहता बाजूलाच असलेल्या दुचाकींनी पेट घेतला तसेच महेंद्रा कंपनीची मालवाहतूक करणारी गाडीही पेटली. या आगीमुळे एकूण तीन दुचाकी, रीक्षा तसेच मालवाहतूक करणारी गाडी मिळून पाच वाहनांचे नुकसान होवून केवळ त्यांचा सांगाडाच शिल्लक राहिला. पोलिस वसाहतीतील कर्मचार्‍यांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला तर पालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरा शहर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.