भुसावळात पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीनची निगराणी

0

रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे झाली दाखल

भुसावळ- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील शासकीय गोदामात ईव्हीएम मशीन दाखल झाले असून 24 तास त्यासाठी पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आली. शुक्रवारी रात्री पाच कंटेनरमधून चार हजार 360 कंट्रोल युनिट व सात हजार 400 बॅलेट युनिटच्या एकूण 11 हजार 760 पेट्या बंगळूरूहून तहसील कार्यालयामागील शासकीय गोदामात दाखल झाल्या. महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत पेट्या उतरवण्यात आल्या. निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार विजय भालेराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. ईव्हीएमच्या पेट्या शासकीय गोदामात ठेवल्यामुळे शनिवारी पहाटे गोदामाला सील लावण्यात आले.

सशस्त्र बंदोबस्तात आले ईव्हीएम
ईव्हीएम आणण्यासाठी जळगाव येथील महसूल अधिकारी व पोलिसांचे पथक गेल्या आठवड्यात बंगळूरला गेले होते. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात ईव्हीएम असलेले पाच कंटेनर शुक्रवारी रात्री भुसावळात दाखल झाले. बंगळूरू ते भुसावळ असा प्रवास पूर्ण करण्यासाठी वाहनांना चार दिवस लागले. वाटेतही ठिकठिकाणी ईव्हीएम घेऊन जाणार्‍या कंटेनरची नोंद घेण्यात आली.