भुसावळात प्रथमच भक्तीमय त्रिवेणी संगम सोहळा

0

वारकरी संमेलन, कीर्तन महोत्सव आणि कृतज्ञता व ऋणानुबंध सन्मान सोहळा

भुसावळ – शहरातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरू धनजी महाराज प्रतिष्ठान भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळात प्रथमच वारकरी संमेलन, भव्य कीर्तन महोत्सव आणि कृतज्ञता व ऋणानुबंध सन्मान सोहळा असा भक्तीमय त्रिवेणी संगम सोहळा 2 ते 9 डिसेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. शहरातील वांजोळा रोड लगत असलेल्या आपले परीवार सार्वजनिक वाचनालय आवारात आयोजित कीर्तन महोत्सवादरम्यान रोज रात्री आठ वाजता कीर्तनकारांची कीर्तने होतील. मन मंदिरा, गजर भक्तीचा आणि आनंदाचा सोहळा या हेतूने कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म व वाचन संस्कृतीचा जागर करण्यासाठी हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 2 डिसेंबर रोजी लक्ष्मण महाराज, 3 रोजी मयूर महाराज, 4 रोजी दत्तात्रय महाराज, 5 रोजी दगडू महाराज, 6 रोजी किशोर महाराज, 7 रोजी भरत महाराज, 8 रोजी दीपक महाराज यांची कीर्तने होतील. कीर्तन सेवा अनुक्रमे मुरलीधर पाटील, पराग पाटील, संजय पाटील, पुष्पक भिरूड, सुरेश सूर्यवंशी, दिलीप भारंबे, शांताराम पाटील व लक्ष्मण पाटील यांनी स्वीकारल्या आहेत. त्याचप्रमाणे 9 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य दिंडी सोहळा होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता वारकरी संमेलन आणि कृतज्ञता व ऋणानुबंध सन्मान सोहळा होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या भक्तीमय त्रिवेणी संगम सोहळा कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान यांनी केले आहे.