भुसावळात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घूण खून

0

24 तासात शहरात घडल्या दोन अप्रिय घटना ; भुसावळ सत्र न्यायालयाने सुनावली आरोपीला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

भुसावळ- शहरात 24 तासात वृद्धेसह तरुणीचा खून झाल्याची घटना रविवार, 14 एप्रिल रोजी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या काहीच तासानंतर शहरातील पूर्व हुडको भागाजवळील रहिवासी प्रीती ओंकार बांगर (22) या तरुणीचा एकतर्फी प्रेमाच्या कारणातून खून झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहर पोलिसांनी प्रवीण विष्णू इंगळे (27, राहुल नगर, भुसावळ) यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध रविवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीला सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरीक भयाच्या सावटाखाली असून पोलिस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपयशी ठरल्याने नागरीकांमधून त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

एकतर्फी प्रेमसंबंधातून तरुणीचा केला खून
शहरातील पालिकेच्या हुडको भागातील रहिवासी असलेल्या प्रीती ओंकार बांगर (22) या तरुणीने आपल्याशी प्रेमसंबंध ठेवावेत तसेच लग्न करण्यासाठी संशयीत आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (27, राहुल नगर, भुसावळ) याने गळ घातली होती मात्र तरुणीच्या कुटुंबियांनी त्यास विरोध केल्याने आरोपी रविवारी रात्री नऊ वाजता तरुणीला भेटण्यासाठी आला मात्र त्यावेळीही दोघांमध्ये वाद झाल्याने आरोपी सोबत आणलेल्या चाकूने प्रीतीवर हल्ला चढवला. गळ्यावर तसेच पोटावर आरोपी सपासप वार करीत असतानाही तिने जीव वाचवण्यासाठी पळ काढलत कॉलनीतील सीमा ओंकार तायडे यांच्या घरात आश्रय घेतला मात्र तेथेही आरोपीने तिच्यावर हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून ती उपचारार्थ दाखल होण्यापूर्वीच मृत्यूमुखी पावली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी आरोपीस घटनास्थळावरून चाकूसह ताब्यात घेतले. रात्री उशिरा तरुणीचे मेहुणे राहुल सिद्धार्थ अहिरे (मनमाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने प्रेमसंबंधाला नकार दिल्याने आरोपीने खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी व्यवसायाने चालक
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (27, राहुल नगर, भुसावळ) या डीआरएम कार्यालयातील खाजगी वाहनांवर चालक म्हणून कामास होता मात्र काही कारणास्तव त्याने नोकरी सोडल्यानंतर त्याने खाजगी वाहनावर वर्दी मिळेल त्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली तर तरुणीने आयटीआयच्या शिक्षणानंतर रेल्वेत अँप्रेटीसशिप केल्याची माहिती मिळाली.

100 नंबर नॉट रीचेबल
पोलिस प्रशासनाचा इर्मजन्सी क्रमांक 100 असलातरी तो नॉट रीचेबल असल्याने मयताच्या बहिणींनी शहर पोलिसात आल्यानंतर त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपी हल्ला करीत असताना पोलिसांशी अनेकवेळा संपर्क साधला मात्र संपर्क झाला नाही, अशी कैफियतही या भगिनींनी पोलिसांकडे मांडली.