गुजरातमधून प्लॅस्टीकची आवक ; पालिका पथकाचा आता थेट दुकानाला टाळे ठोकण्याचा इशारा
भुसावळ- 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापराला, विक्रीला बंदी असलीतरी शहरात सर्रास कमी मायक्रॉनच्या पिशव्या, प्लास्टिक बाऊल, द्रोण, चमचे यांचा खुलेआम वापर सुरूच असल्याने पालिकेच्या पथकाने शुक्रवारी धडक कारवाई करीत तीन दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 15 हजारांचा दंड वसुल केला. या कारवाईने शहरातील प्लॅस्टीक विक्रेत्यांसह प्लॅस्टीकचा वारेमाप वापर करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मार्च 2018 रोजी राज्यात प्लास्टिक बंदी घोषणा करण्यात आली होती मात्र तयार असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विल्हेवाट करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदत व्यापारी व दुकानदारांना दिली. बंदी संपल्यावर पालिका प्रशासनाने बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री केल्याबद्दल अनेकांवर कारवाईदेखील केली व कॅरीबॅग वापरण्याचे प्रमाण कमी झाले मात्र पुन्हा गुजरातमधून प्लॅस्टीक कॅरीबॅग्जचा पुरवठा झाल्याने शहरात ‘जैसे थे’ चित्र झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी शुक्रवारीपासून कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
बंदीनंतर विक्रेत्यांसह दुकानदारांकडून सर्रास वापर
किराणा दुकानदारांकडून अजूनही कमी मायक्रॉनच्या पिशव्यातून धान्य, कडधान्ये, मसाले व अन्य पदार्थांची विक्री सुरु आहे. शहरातील मटण मार्केटमध्ये मटण, चिकण व मासे विक्रेत्यांकडून कमी मायक्रॅानच्या पिशव्यांचा वापर सार्वत्रिक आहे शिवाय शहराच्या आठवडे बाजारातही वेगळी परीस्थिती नाही. प्लास्टिक कोटेड पत्रावळ्या, द्रोण बाऊलची विक्री छुप्या पद्धत्तीने सुरू असल्याचा आरोप आहे.
सरकारी कार्यालयांनी प्लास्टीक बंदीचा उचलावा बडगा
प्लास्टिक बंदीवर कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने महानगरपालिका,नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल, पोलिस, अन्न व औषध प्रशासन, वन विभागासह सर्व विभागांना दिले आहेत. स्थानिक पालिकांकडून कारवाई केली जात असलीतरी तालुक्यातील ग्रामपंचायतीसह अन्य विभागाकडून प्लास्टिक बंदीवर कोणतीही कारवाई झाल्याचे एकही उदाहरण नाही. प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळही कारवाईबाबत सुस्त आहे. सर्वच सरकारी कार्यालयांनी प्लास्टिक बंदीचा बडगा उचलला तर प्लास्टिक बंदी सत्यात उतरु शकेल. शासकीय कार्यालयांनी पाण्याच्या बाटल्यांऐवजी स्टीलचे तांबे व फुलपात्र वापरण्यास समाजात चांगला संदेशही जाणार आहे मात्र सरकारी कार्यालयात पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरून प्लास्टिक बंदी धाब्यावर बसवली जात आहे. 500 मिली लीटरपेक्षा कमी मिली मीटरच्या बाटल्यातून पाणी, ज्यूस, शितपेयांना बंदी असली तरी छोट्या पाण्याच्या बाटल्या व ज्यूस, शितपेयांची विक्री सुरू आहे.
या प्लॅस्टीक वस्तूंना आहे बंदी
प्लास्टिक पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या), थर्माकॉल, डिस्पोजेबल ताट, कप्स, प्लेटेस्, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी, वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉलीलेन बॅग्ज, द्रव प्रदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य, प्लास्टिक, प्लास्टिक वेष्टन या वस्तूंना बंदी करण्यात आली आहे.
प्लॅस्टीक आढळल्यास थेट परवाना होणार रद्द
कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरीयल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नुकतीच मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत दिली आहे.
भुसावळातील तीन दुकानदारांकडून दंड वसुल
पालिकेचे कर्मचारी प्रदीप पवार यांच्यासह पथकाने शुक्रवारी शहरातील यावल रोडवरील गुजराथी केक शॉपमधील कर्मचारी प्रकाश पाटील यांच्याकडून तसेच दत्त बेकरीच्या पुष्पा पुष्पेंद्र लाडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसुल केला. या दुकानातून प्लास्टीक कप तसेच पिशव्या जप्त करण्यात आल्या शिवाय सायंकाळी जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समधील श्री भरकादेवी आईस्क्रीम सेंटरमधून प्लॅस्टीकचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका पती अजय पाटील यांनी कारवाईला काहीसा विरोध केल्यानंतर पालिकेचे पथक पोलिस ठाण्यात पोहोचले मात्र नंतर संबंधित दुकानदाराने दंड भरल्याने वादावर पडदा पडला.