रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणात भर ; डीआरएम यांचे कार्य कौतुकास्पद -खासदार
भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात शंभर फूट उंचीवर तिरंगा ध्वज खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते रीमोटचे बटण दाबून शुक्रवारी सकाळी 10 वाजता फडकवण्यात आला. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत प्रशंसा करीत डीआरएम आर.के.यादव यांच्या या कामांमध्ये सिंहाचा वाटा असल्याचे सांगत त्यांच्यामुळे रेल्वे स्थानकासह रेल्वे परीसराचा चेहरा-मोहरा बदलत असल्याचे गौरवोद्गार काढले तर डीआरएम यादव यांनीदेखील मनोगतात खासदारांच्या कार्याचा गौरव केला. प्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी राष्ट्रगीत म्हटले.
स्थानकाच्या सौंदर्यीकरणात पडली भर
रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला असलेल्या प्रवेशद्वारासमोरच भव्य रणगाडा त्यासोबतच आता शंभर फूट उंचीवर लावण्यात आलेल्या ध्वजामुळे रेल्वे स्थानकाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. येणार्या-जाणार्या प्रवाशांना या बाबींचे आकर्षण निर्माण झाले असून लांबवरील नागरीकांनादेखील ध्वज पाहता येणार आहे.
यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डीआरएम आर.के.यादव, नगराध्यक्ष रमण भोळे, एडीआरएम मनोज सिन्हा, वरीष्ठ इंजि.अभियंता राजेश चिखले, सिनी.डीसीएम सुनील मिश्रा, वरीष्ठ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, वरीष्ठ यांत्रिक अभियंता पी.रामचंद्रन, वरीष्ठ सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे, वरीष्ठ मंडल मटेरीयल मॅनेजर राजेश पाटील, मंडल इंजिनिअरींग अभियंता एम.बी.तोमर, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, सिनी.सेक्शन इंजि.राजेंद्र देशपांडे, स्टेशन मॅनेजर मनोज श्रीवास्तव तसेच नगरसेवक युवराज लोणारी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, सतीश सपकाळे आदींची उपस्थिती होती.
प्रवाशांसाठी चांगली उपलब्धी -डीआरएम यादव
शंभर फूट उंचीवरील ध्वज व दर्शनी भागातील रणगाड्यामुळे रेल्वे स्थानकाचे सौंदर्य खुलले असून प्रवाशांसाठी ही चांगली उपलब्धी आहे. सेंट्रल रेल्वेत केवळ भुसावळात आज ध्वजारोहण झाले तर देशभरातील 75 रेल्वे स्थानकांवर अशा पद्धत्तीने शंभर फूट उंचीवर ध्वज फडकवण्यात येणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.