भुसावळात बंद घरातून लाखोंचा ऐवज लंपास
भुसावळातील राजेश्वरी नगरासह समृद्धी पार्कात धाडसी घरफोडी : गस्त कुचकामी
भुसावळ : पोलिसांच्या अस्तित्वालाच चोरट्यांनी शहरात आव्हान देत चोर्या-घरफोड्यांचा सपाटा लावल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच नव्याने होणार्या चोर्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील सुरभी नगराजवळ राजेश्वरी नगरासह समृद्धी पार्क भागात बंद असलेल्या घराला चोरट्यांनी टार्गेट करीत लाखोंच्या सोन्यासह रोकड लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला तर तज्ज्ञांनी ठसे टिपले.
तिसर्या मजल्यावरील बंद घर फोडले
सुरभी नगराजवळील एस.पी.राका नगरातील प्लॅट क्रमांक 12 मध्ये तिसर्या मजल्यावर अर्चना अरुण तारे या एकट्याच राहतात. बर्हाणपूर येथे त्या आईसह भावाची भेट घेण्यासाठी गेल्याने प्लॅटला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी प्लॅटमध्ये प्रवेश करीत कपाटातील सोन्याच्या महागड्या बांगड्या तसेच 20 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. शेजारी राहणार्या रीता नायके यांना तारे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पहाटेच तारे यांना भ्रमणध्वनीवर माहिती कळवल्यानंतर त्यांनी भुसावळात धाव घेत पोलिसांना माहिती कळवली. विशेष म्हणजे पकडले जावू नये या भीतीने चोरट्यांनी शेजारच्या घरांना कड्या लावल्या. तारे यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली असून त्यात 20 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे नमूद केले मात्र नेमका सोन्याचा काय एैवज लांबवण्यात आला याचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
समृद्धी पार्कातही घरफोडी
समृद्धी पार्कमधील अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावर अनिल प्रभाकर धांडे राहतात. पुण्याला ते गेल्यानंतर प्लॅटला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केली. नेमका काय ऐवज चोरीला गेला? याची माहिती धांडे शहरात आल्यानंतरच कळणार आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, होमगार्ड योगेश सोनवणे भेट देवून पाहणी केली. घर मालक गावाहून परतल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला तर जळगावच्या तज्ज्ञांनी ठसे टिपले.