भुसावळात बंद घर फोडले : दोन लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

भुसावळ : तालुक्यातील कंडारी भागातील नागसेन कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या रोकडसह लाखो रुपये किंमतीचे सोने लांबवले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कंडारी येथील नागसेन कॉलनी भागातील प्लॉट नंबर 24 मध्ये सेवानिवृत्त लोकोपायलट सुभाष पांडुरंग खैरे वास्तव्यास आहेत. खैरे हे कुटुंबासह कामानिमित्त पिंपरीया, जि.छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 10 रोजी मध्यरात्री 12.30 ते दोन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे ग्रील वाकवत प्रवेश केला व गोदरेज कपाटातील दोन लाखांची रोकड, सोन्याचे दागिने तसेच हॉलमधील डीव्हीआर लंपास केला. गावाहून आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलिसात धाव घेतली. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.