भुसावळात बंद घर फोडले : 80 हजारांचा ऐवज चोरीला

भुसावळ : शहरातील साकेगाव शिवारातील गट क्रमांक 304 मधील रहिवाशाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 50 हजारांच्या रोकडसह 80 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास लागत नसताना नव्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे रहिवासी धास्तावले असून रात्रीची गस्त फार्स ठरत असल्याचा उघड आरोप होत आहे.

बंद घराला केले टार्गेट
साकेगाव शिवारातील गट क्रमांक 304 मधील सुभाष गॅरेजजवळील प्लॅट क्रमांक तीनमध्ये ज्योती ज्ञानेश्वर बाविस्कर (34) कुटुंबासह राहतात. बाविस्कर कुटुंबातील सदस्य गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 20 रोजी रात्री 11 ते 21 जुलैच्या पहाटे 5.45 वाजेदरम्यान बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 50 हजारांची रोकड व 30 हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे व चांदीच्या पट्ट्या असा एकूण 80 हजारांचा ऐवज लांबवला. बाहेर गावाहून ज्योती बाविस्कर आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजय कंखरे करीत आहेत.