भुसावळात बनावट चावी बनवणे पडले महाग : दिड लाखांच्या ऐवजावर डल्ला

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी निर्मल परमानंद कुकरेजा यांच्या घरातील कपाटाची चाबी हरविल्याने रस्त्याने जात असलेल्या चाबी बनविणार्‍यास कपाटाची चाबी बनविण्यासाठी घरात बोलाविले मात्र दोन्ही चाबी बनविणार्‍या भामट्यांनी हात चलाखी करीत कपाटातील एक लाख 43 हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

चावी बनवणे पडले महागात
शहातील सिंधी कॉलनीतील रहिवासी निर्मल कुकरेजा यांनी मंगळवार, 9 रोजी दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परीसरात कुलूपाची चाबी तयार करणारे दोन जण आले असता कुकरेजा यांनी त्यांना घरात बोलावून घरातील कपाटाचे लॉक खराब झाल्याने त्यांची चाबी बनवून देण्याबाबत सांगितले. कपाटाची चाबी बनविण्याचे कामसुरू असतांनाच चाबी बनविणार्‍यांनी घरातून कापूस आणण्याबाबत सांगितले. कुकरेजा घरात कापूस घेण्यास गेले असता, चाबी बनविणार्‍यांनी हात चलाखी करीत कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिणे लांबविले. अगदी काही मिनीटातच चाबी बनविण्यासाठी आलेल्या दोन्ही भामट्यांनी हात सफाई करीत कुकुरेजा यांना गंडा घातला. चोरट्यांनी कपाटातील लॉकमध्ये असेले एक लाख रूपये किंमतीचे 25 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 16 हजार रुपयांची प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या तसेच दोन ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दोन जेन्टस अंगठ्या, चार हजार रुपये किंमतीच्या लहान मुलीच्या कानातील रींग, पाच हजार रुपये किंमतीच्या कानातील रींग आणि दोन हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात निर्मल कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे पुढील तपास करीत आहे.