323 बचत गटांची नोंदणी ; महोत्सवात बहिणाबाईंच्या जीवनावर पोस्टर प्रदर्शन
भुसावळ- खान्देशच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या सन्मानार्थ व महिला बचत गटाच्या आर्थिक विकासासाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर शनिवारपासून बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात राज्यभरातील 323 बचत गटांनी नोंदणी करून आपले स्टॉल लावले आहेत. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आले. महोत्सवात ‘आजीबाईची भातुकली’चे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यात पंकजा मुंडे यांनी स्वतः चकली काढून त्याचे उद्घाटन केले तसेच बहिणाबाईंच्या जीवनावर आधारीत सचित्र पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यातील सचित्र ओव्यांना उपस्थितांकडून दाद मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 12 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन चालणार असून या दरम्यान दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.