भुसावळात बहुजन मुक्ती पार्टीचा मोर्चा

0

ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यासह अ‍ॅट्रासिटी कायदा कठोर करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; तत्कालीन तहसीलदारांवर कारवाईसह विविध समस्या सोडविण्याची मोर्चेकर्‍यांची मागणी

भुसावळ- सवर्णांना दिलेले 10 दहा टक्के आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण मागे घ्यावे, निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा, भुसावळचे तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे पालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान गुरुवारी दुपारी 12 वाजता मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांबाबत मोर्चेकर्‍यांनी प्रचंड घोषणाबाजी करून शहरवासीयांचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या मागण्यांसाठी मोर्चा
लाल जैन मंदिर, तक्षशिला नगर या भागातील रस्त्यांसह पाण्याची समस्या सोडवावी, छायादेवी राका नगर, फेज- 1 मधील नागरी समस्या सोडवाव्यात, तालुका व शहरातील नागरीक रेशन कार्डासाठी अर्ज देवूनही अधिकारी कामे करीत नसल्याने त्यांची चौकशी करावी, भुसावळ शहरातील कामगारांच्या नोंदणीसाठी कामगार नोंदणी कार्यालय सुरू करावे, समता नगर, आंबेडकर नगर, सु.रा.आंबेडकर, न्यू.आंबेडकर नगर आदी भागातील दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या उद्भवल्याने ही समस्या सोडवण्यासह दर्शनानंद बुद्धविहारामागील नाल्याची स्वच्छता करावी आदी मागण्यांबाबत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर माजी जिल्हाध्यक्ष विजय सावळे, राष्ट्रीय मूलनिवासह महिला संघाच्या कल्पना म्हस्के, हारूण मन्सुरी, कुंदन तायडे, हाफिज फिरोज, अनिस अहेमद, भास्कर शेवाळे, प्रेमा पाने, नंदा सोनवणे, समाधान इंगळे, मुकेश वाघ, नितीन तायडे, संगीता तोरणे, संतोष ठोकळ यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.