भुसावळात बायोडिझेलचा कारखाना उद्ध्वस्त ; दोघांना अटक

0

मनीष ट्रॅव्हल्स एजन्सीच्या सतीश घुलेंसह पाच जणांविरुद्ध गुन्हा ; 22 हजारांचे 360 लिटर डिझेल जप्त

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हेपानाचे ते गोजोरा रस्त्यावरील बेकायदा सुरू असलेला बायोडिझेलच्या कारखान्यावर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकून कारवाई करीत 21 हजार 600 रुपये किंमतीचे 360 लिटर डिझेल जप्त करीत कारखान्याच्या मालकासह टाटा सुमो चालकाला अटक करून शहरातील मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश घुले यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईने वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून शहरात बेकायदा बायोडिझेल बनवले जात असताना व त्याची बेकायदा विक्री होत असताना पोलिस प्रशासन अनभिज्ञ कसे? याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहन तपासणीनंतर झाला गुन्ह्याचा उलगडा
पोलिस उपअधीक्षक कार्यालयाजवळून जाणार्‍या टाटा सुमो (क्रमांक एम.एच.19 वाय.5303) मधून 360 लिटर डिझेलची बेकायदा वाहतूक होत असताना शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले तसेच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार आदींच्या पथकाला आढळल्याने सुमो चालक संजय दगा पाटील (भास्कर नगर, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने हे डिझेल शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्समधील मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश घुले यांच्या सांगण्यावरून व त्यांच्याकडे कामाला चालक म्हणून असल्याचे सांगत ते कुर्‍हेपानाचे ते नशिराबाद दरम्यान असलेल्या गोजोरे रस्त्यावरील संदेश फॅक्टरीतून आणायचे सांगितल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचत संदेश एनर्जीस फॅक्टरीत छापा टाकल्यानंतर संदेश सुरेश अग्रवाल (आठवडे बाजार, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर ही फॅक्टरी अग्रवाल यांनी आपल्या मालकिची असल्याचे सांगत येथे बायोडिझेल बनवले जात असल्याची कबुली दिली. कंपनीच्या आवारात लोखंडी पाच टाक्यांमध्येे मॉशरॉईजर ऑईल, लाईट डिझेल ऑईल व खराब ऑईलने भरलेल्या 200 लिटरने भरलेल्या टाक्या आढळल्या तसेच पॅरालायझेस नावाची मशीन आढळली व टँकर (क्रमांक एम.एच.04 एफ.पी.4650) आढळल्याने तो पोलिसांनी जप्त केला. संशयीत आरोपी बाजार भावाच्या दरापेक्षा सुमारे चार रुपये कमी दराने विक्री करीत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बेकायदा बाझोडिझल बनवल्याची कबुली
अटकेतील आरोपी तथा संदेश अग्रवाल यांनी सर्व साहित्यापासून बायोडिझल बनवत असल्याची कबुली दिल्याने चालक संजय पाटील व फॅक्टरी मालक संदेश अग्रवाल यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली तसेच सर्व जप्त साहित्यापासून बायोडिझेल तयार करीत असल्याची आरोपी संदेश अग्रवालने पोलिसांना कबुली दिली आहे. दरम्यान, अटकेतील चालक संजय हा मनीष ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कामाला असल्याची त्याने पोलिसांना कबुली दिली आहे.

पाच आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप विक्रम पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश भिका घुले (भुसावळ) यांच्यासह फॅक्टरी मालक संदेश सुरेश अग्रवाल (रा.पाचोरा, जि.जळगाव), फिरोजखान मोहमदखान (रजा नगर, भुसावळ) व मोहमदखान तुरखा खान (मुस्लिम कॉलनी, भुसावळ), टाटा सुमो चालक संजय दगा पाटील (पाचोरा) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चालक संजय पाटील यांच्यासह फॅक्टरी मालक संदेश अग्रवाल यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.