भुसावळात बेवारस मॅग्झीनसह तीन काडतूस आढळले
भुसावळ शहरातील कवाडे नगर भागातील घटना : शहर पोलिसांकडून सखोल चौकशी
भुसावळ : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर भागातील बौद्ध विहाराजवळ असलेल्या रहिवाशाच्या घरामागील मोकळ्या जागेत गावठी कट्ट्याचे मॅग्झीनसह तीन जंगलेले काडतूस आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हे मॅग्झीन व काडतूस नेमके कुणाचे ? वा कुणी येथे आणून टाकले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भुसावळ शहर पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. शहर पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
शहर पोलिसांची धाव
शहरातील कवाडे नगर भागातील बौद्ध विहाराजवळ वास्तव्यास असलेल्या दोन रहिवाशांच्या घरामागील सामायीक भिंतीजवळ मोकळ्या जागी काडतूस व मॅग्झीन पडून असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांना गुरुवारी रात्री 11 वाजता मिळाली होती. याबाबत त्यांनी शहर पोलिसांना कारवाईबाबत आदेश दिले होते. शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, जाकीर मन्सुरी, जुबेर शेख, मोहम्मद वली सैय्यद आदींनी रात्रीच घटनास्थळ गाठल्यानंतर पोलिसांनी बेवारसरीत्या पडून असलेले मॅग्झीन व तीन गंजलेल्या अवस्थेतील काडतूस जप्त केले.
पोलिस काडतूस व मॅग्झीन तपासणीसाठी पाठवणार
नागरीक राहत असलेल्या परीसरात बेवारसरीत्या काडतूस व मॅग्झीन नेमके कुणी आणून टाकले? त्यांचा हा प्रकार करण्यामागे नेमका कुणाला अडकावण्याचा तसेच नेमका काय हेतू होता ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भुसावळ शहर पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नसलातरी स्टेशन डायरीला त्याबाबत नोंद केली आहे शिवाय काडतूस अत्यंत जंगलेल्या अवस्थेतील असल्याने ते बॅलेस्टीक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे शिवाय जप्त करण्यात आलेले मॅग्झीन गावठी कट्ट्याचे असल्याने त्याचा अन्य भाग नेमका कुणाकडे व कुठे? याचीदेखील बारकाईने चौकशी सुरू आहे.