भुसावळ- शहरातील लिंपस क्लब भागात भरदिवसा चोरट्याने दरवाजाची लाकडी फट तोडून गोदरेज कपाटातील 18 हजारांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोषागार कार्यालयातील ज्यु.कारकून संगीता सुरेश इंगळे या लिंपस क्लब भागातील गिरणा कॉलनीतील क्वार्टर नंबर 955 ब मध्ये राहतात. सोमवारी त्या ड्युटीला गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधत पाठीमागील बाजूच्या दरवाजाची लाकडी फट तोडून घरात प्रवेश केला. गोदरेज कपाटातील 3.5 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, सहा हजारांची रोकड व तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून 17 हजार 500 रुपयांचा मोबाईल लांबवत चोरट्याने पळ काढला. सोमवारी सकाळी 10 ते 12.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पाटील करीत आहेत. दरम्यान, शहरात जुन्या गुन्ह्यांचा तपास लागत नसतानाच पुन्हा चोर्या-घरफोड्या वाढल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.