भुसावळात भरदिवसा घरफोडी ; 55 हजारांचा ऐवज लंपास

0

नागरीकांमध्ये घबराट ; पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील रघकुल कॉलनीत भर दिवसा चोरट्यांनी घरफोडी करीत पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. शहरात जुन्या चोर्‍यांचा तपास थंड बस्त्यात असताना पुन्हा वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांची गस्त तोकडी ठरत असल्याचा आरोप होत आहे. या  प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा 55 हजारांची घरफोडी
रेल्वे डीआरएम कार्यालयातील स्टेनो असलेल्या तिलोत्तमा रत्नाकर जावळे (रघुकुल कॉलनी, सोन्या मारोती मंदिरासमोर, नेब कॉलनीपुढे, जामनेर रोड, भुसावळ) या बुधवार, 27 रोजी सकाळी साडेनऊ वाजता नोकरीवर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी किचन रूमचा लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. हॉलमधील पलंगावर कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, 20 हजार रुपये किंमतीच्या आठ ग्रॅमच्या अंगठ्या, पाच हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स व सोन्याचे मणी तसेच पाच हजारांची रोकड लांबवली. जावळे या दुपारी 1.10 वाजता जेवणासाठी घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. दरम्यान, जुन्या वर्णनानुसार सोन्याची किंमत लावण्यात आली असलीतरी प्रत्यक्षात सुमारे एक लाखांचा ऐवज घरफोडीत चोरीस गेला आहे.